गुंतवणुकीचे मूलभूत नियम । Laws of Investment
१. सुरक्षितता
गुंतवणुकीचा आपला पहिला नियम आहे सुरक्षितता म्हणजेच आपण जिथे कुठे गुंतवणूक करणार आहोत तिथे आपली गुंतवणूक सुरक्षित असली पाहिजे.
बरेच लोक राष्ट्रीय बँकेत जसे कि स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक इ. अशा मोठ्या बँकेत आपले पैसे गुंतवणे पसंत करतात.
उदा. बँकेत सेव्हिन्ग अकाउंट उघडणे किंवा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडणे आणि बँक अकाउंटमध्ये पैसे साठवणे.
बँके खात्यात पैसे गुंतवताना आपल्याला आपले पैसे अगदी सुरक्षित असल्याची भावना असते.
अशाचप्रकारे आपण आपले कष्टाने कमावलेले पैसे कुठेही गुंतवताना आपले पैसे सुरक्षित असतील अशाच ठिकाणी गुंतवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.
आपली बचत हेच आपले भांडवल असते तेव्हा भांडवल टिकून राहिले तरच आपल्याला त्यावर नफा कमावता येईल, आपण खूप जास्त परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात आपले भांडवलच गमावता काम नये.
वर्तमानपत्रात किंवा टिव्हीवर अमुक दिवसात पैसे दुप्पट तमुक दिवसात पैसे चारपट अशा फसव्या योजनांना बळी पडलेल्या लोकांच्या अनेक बातम्या नेहमी झळकत असतात तेव्हा अशा योजनांपासून चार हात लांब रहाण्याचाच सल्ला मी आपल्याला देईल.
२. लिक्विडीटी
लिक्विडीटी म्हणजे आपण ज्या कुठल्या साधनात आपले पैसे अडकवणार आहोत त्या साधनांतून आपले पैसे आपल्याला अगदी सुलभतेने परत घेता आले पाहिजे.
उदा. आपण आपले पैसे सेव्हिन्ग अकाउंटमध्ये ठेवल्यास आपण एटिएम वापरून, चेक वापरून तात्काळ आपले पैसे वापरायला काढू शकतो.
याउलट आपण आपले पैसे जमीनजुमला, घर, किंवा फ्लॅट थोडक्यात रिअल इस्टेटमध्ये अडकवल्यास आपल्याला आपले पैसे परत मिळवायचे असल्यास थोडे अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
आपल्याला आपले पैसे रोख किंवा वापरण्याजोग्या स्थितीत परत मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या जमिनीसाठी, फ्लॅटसाठी ग्राहक शोधावा लागेल, व्यवहार करावा लागेल, व्यवहाराची कायदेशीर दृष्टीने पूर्तता करावी लागेल त्यानंतरच आपल्याला आपली गुंतवणूक परत मिळू शकेल.
आपण नेहमी काही विशिष्ट उद्देशाने गुंतवणूक करत असतो जसे कि घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीसाठी, लग्नासाठी, म्हातारपणाची तजवीज इ.
अशावेळी आपल्याला आपली बचत किंवा गुंतवणूक वेळेवर उपलब्ध झालीच पाहिजे या दृष्टीने देखील विचार करावा असे मी सुचवू इच्छितो.
३. परतावा
गुंतवणुकीचे तिसरे उद्दिष्ट्य म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशावर चांगला परतावा मिळवणे.
आपले पैसे आहे तेवढेच राहिले तर महागाईच्या ओघात एक दिवस आपले पैसे एक दिवस नाममात्र गुंतवणूक किंवा बचत म्हणून शिल्लक राहतील तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवणे महत्वाचे ठरते.
परतावा किंवा प्रॉफिट मिळवणे म्हणजे पैशातून पैसा कमवणे किंवा पैशालाच कामाला लावणे असे आपण म्हणू शकतो.
परतावा हि जरी तिसरी पायरी असली तरी गुंतवणुकीवर वाढणाऱ्या महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळवणे गरजेचे आहे हे लक्षात असू द्या.
आपल्याकडे महागाईचा दर सर्वसाधारणपणे ४% ते ५% एवढा आहे आणि बचत खात्यावर आपल्याला बँक ३.५% -४% व्याज देत असेल तर आपली गुंतवणूक तोट्यात चालली आहे हे नक्की समजावे.
४. सुलभता
आपण ज्या कुठल्या साधनात गुंतवणूक करणार आहोत त्या साधनात गुंतवणूक करण्याची पद्धत सहज सोपी असावी म्हणजेच कमी गुंतागुंतीची असावी असे असल्यास अधिक चांगले होईल.
अनेकदा गुंतवणुकीचे साधन किचकट असल्यास आपण त्याकडे कानाडोळा करतो त्यामुळे गुंतवणुकीचे साधन निवडताना आपण सुलभ साधनाची निवड करावी.
उदा. सुरवातीला बँक अकाउंट उघडण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे जमा करावी लागत आता मात्र ऑनलाईन अकाउंट उघडणे शक्य असल्याने अनेक लोक अकाउंट उघडत आहे.
आपल्याला जर गुंतवणूक म्हणून एखादे घर खरेदी करायचे असेल तर आपल्याला घराची कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे आणि घर खरेदी करण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील पार पाडणे गरजेचे आहे.
५. खर्च
गुंतवणूक करण्याची प्रक्रिया कमी खर्चीक असावी याशिवाय गुंतवणूक करताना आपल्याला गुंतवणुकीसंबंधी असणारे खर्च जाणून घेणे गरजेचे आहे.
उदा. घर खरेदी करताना सरकारी कर, स्टॅम्प ड्युटी, ब्रोकरचे चार्जेस कागदपत्रे इ मोठा खर्च असतो तसेच बँक खात्यात आपल्याला काही ठराविक रक्कम ठेवावी लागते अन्यथा शुल्क द्यावे लागते.
सोन्यात गुंतवणूक केल्यास सोनाराकडे मजुरीचा खर्च येतो, सोन्यात घट पकडली जाते किंवा सोने सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर्सची गरज भासते.
अशाप्रकारे गुंतवणूक करत असताना गुंतवणूक सुरु करण्यासाठी, सुरु असतांना आणि गुंतवणूक कमी करण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मला वाटते.
६. वेळ
गुंतवणूक करण्यासाठी लागणारा कालावधी कमी असावा.
आजकाल इंटरनेटमुळे आणि सर्वांच्याच हाती स्मार्ट फोन आल्यामुळे गुंतवणुकीची प्रक्रिया अगदी कमीवेळेत पूर्ण करता येते.
आपल्याला गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे कि बँक अकाउंट, सोने, जमीनजुमला, शेअर्स इ.
उदा. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे थोडे वेळखाऊ काम आहे, त्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे सोपे आहे, शेअर मार्केट आणि बँकेत गुंतवणूक करणे सर्वात सोपे आहे.
गुंतवणुकीची साधने । Instruments of Investment
खाली मी गुंतवणुकीच्या साधनांचे विविध पर्याय दिले आहेत.
१. बँक अकाउंट: सेव्हिन्ग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट इ
२. रिअल इस्टेट : जमीन, प्लॉट, घर, फ्लॅट इ
३. मौल्यवान धातू: सोने, चांदी.
४. बॉण्ड्स
५. शेअर्स
सध्या पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपण शेअर बाजाराविषयी चर्चा करत असल्याने या लेखात आपण शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी चर्चा करणार आहोत.
शेअर्समध्ये गुंतवणूक । Investment in Stocks
आता आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आपल्या गुंतवणुकीच्या कसोट्यांवर तपासून बघणार आहोत.
१. सुरक्षितता
आपण शेअर मार्केटचा इतिहास बघितल्यास शेअर मार्केटचे बीज अगदी तेराव्या शतकातच पेरले गेल्याचे समजते.
भारतात आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला १५० वर्षाचा इतिहास आहे तेव्हा शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे आहे असे वाटण्याचे काही कारण नाही.
आपण शेअर बाजारात व्यवस्थित अभ्यास करून पैसे गुंतवल्यास आपले पैसे नक्कीच सुरक्षित राहू शकतात.
याशिवाय शेअर बाजारावर देखरेख करण्यासाठी सेबी (SEBI = Securities and Exchange Board of India) असल्याने लहान गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यासाठी भरपूर तरतुदी केल्या गेल्या आहेत आणि केल्या जात आहेत.
२. लिक्विडीटी
सध्या आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी झेरोधासारख्या अनेक ऑनलाईन ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकतो आणि शेअर्स विकल्यानंतर आपण आपली रक्कम ट्रेडिंग अकाउंट मधून बँक अकाउंटमध्ये २ दिवसात मिळवू शकतो.
शेअर बाजरातील गुंतवणूक हि डिमॅट अकाउंटमध्ये साठवली जात असल्याने गुंतवणूक कमी करणे सोपे झाले आहे.
३. परतावा
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास आपण मोठी संपत्ती कमावू शकतो आणि शेअर बाजारातून संपत्ती कमवल्याची अनेक उदाहरणे आहेत.
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील एक नाव वॉरेन बफे हे शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या फायद्याचे उत्तम उदाहरण होय.
भारतीय शेअर बाजरात काम करून बख्खळ संपत्तीं जमा केलेले अनेक गुंतवणूकदार प्रसिद्ध आहेत जसे कि राकेश झुनझुनवाला, राधाकिसन दमानी, रमेश दमानी इ
इन्फोसिस कंपनीचे उदाहरण आपण नक्की ऐकले असेल.
इन्फोसिस कंपनीचा शेअर १९९३ साली ९५ रुपये किमतीवर बाजारात दाखल झाला होता आणि त्यावेळी फक्त १०० शेअर घेणारे आज करोडपती आहे.
४. सुलभता
इंटरनेट आणि मोबाइलफोन, फोन करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून शेअर बाजारात काम करू शकतो.
एका क्लिकवर आपण कोट्यवधींची गुंतवणूक करू शकतो आणि एका क्लिकवर केलेली गुंतवणूक कमी करू शकतो.
एकदा चांगले ज्ञान मिळवल्यास आणि सराव केल्यास शेअर बाजारात काम करणे अतिशय सोपे आहे.
५. खर्च
शेअर बाजारात गुंतवणूक करणे डिस्कउंट ब्रोकर आल्यापासून खूप कमी खर्चाचे झाले आहे.
झेरोधा मध्ये आपले अकाउंट असल्यास आपल्याला गुंतवणुकीसाठी कोणतेही ब्रोकरेज देण्याची गरज नाही.
इन्ट्राडे ट्रेडिंग करत असल्यास आपल्याला एका ट्रेडमागे जास्तीत जास्त फक्त २० रुपये ब्रोकरेज द्यावे लागते.
यावरून आपल्या असे लक्षात येते कि शेअर बाजारात गुंतवणूक करणे किंवा ट्रेडिंग करणे माफक दरात उपलब्ध आहे.
६. वेळ
शेअर बाजारात काम करण्यासाठी आपण घरबसल्या मोबाईल फोनवरून अकाउंट उघडू शकतो आणि लगेचच काम चालू करू शकतो.
- rahul deshmukh
Comments
Post a Comment